
पुणेकरांना कुटुंबीयांसह चांदण्यांच्या प्रकाशात कोजागिरीचा आनंद घेता येणार; महापालिकेच्या उद्यान विभागाचा निर्णय
पुणे, दि. २३ : कोजागिरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व उद्याने रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांना कुटुंबीयांसह उद्यानांमध्ये वेळ घालवता यावा आणि चांदण्यांच्या प्रकाशात कोजागिरी पौर्णिमेचा आनंद घेता यावा, यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाने उद्यानांच्या वेळेत विशेष वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत शहरात एकूण २१६ उद्याने विकसित करण्यात आली आहेत. या उद्यानांना पुणेकर नागरिक, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच शहरात येणारे पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. नागरिकांना विरंगुळ्यासाठी आणि निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यासाठी सार्वजनिक उद्यानांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त नागरिकांना या उद्यानांचा अधिक वेळ आनंद घेता यावा, यासाठी रविवारी उद्यानांच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार, उद्याने सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ४ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत खुली राहणार आहेत.
या निर्णयामुळे पुणेकरांना सायंकाळच्या वेळी उद्यानांमध्ये फेरफटका मारण्यासह कुटुंबीय आणि मित्रपरिवारासोबत कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्याची संधी मिळणार आहे. नागरिकांनी या विशेष सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत करण्यात आले आहे.
महापालिकेचे सहमहापालिका आयुक्त तथा उद्यान विभागाचे प्रमुख डॉ. अशोक दि. घोरपडे यांनी यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.






