राहुल बालवडकर मित्र समूहाच्या वतीने ‘प्रहार’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन; अॅड. उज्ज्वल निकम यांची उपस्थिती, प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
पुणे : देशप्रेमासाठी कार्य करण्याची आणि दहशतवादाविरोधात न्यायालयात खटला लढविण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे, असे प्रतिपादन खासदार तथा ज्येष्ठ विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी केले.
राहुल बालवडकर मित्र समूहाच्या वतीने २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यावर आधारित ‘प्रहार’ या चित्रपटाच्या विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष प्रदर्शनाला अॅड. उज्ज्वल निकम यांनी स्वतः उपस्थित राहून प्रेक्षकांशी संवाद साधला.
या वेळी प्रेक्षकांच्या वतीने डीआयजी महेश्वर रेड्डी, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त अजय कदम आणि सेवानिवृत्त उत्पादन शुल्क अधीक्षक मोहन कदम यांच्या हस्ते अॅड. उज्ज्वल निकम यांचा गौरव करण्यात आला.
‘प्रहार’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. चित्रपट पाहिल्यानंतर उपस्थितांमध्ये देशाभिमानाची भावना निर्माण झाल्याचे दिसून आले. चित्रपट संपल्यानंतर प्रेक्षकांनी ‘भारत माता की जय’ अशा देशभक्तिपर घोषणा देत आपला उत्साह व्यक्त केला.
प्रेक्षकांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल अॅड. उज्ज्वल निकम यांनी आनंद व्यक्त केला. देशप्रेम, दहशतवादाविरोधातील लढा आणि राष्ट्रनिष्ठेची भावना अधोरेखित करणाऱ्या या विशेष प्रदर्शनाच्या माध्यमातून उपस्थितांना देशासाठी योगदान देण्याची प्रेरणा मिळाली. राहुल बालवडकर मित्र समूहाच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.






