
हवा प्रदूषित, आता पाणीही दूषित? पुणेकरांनी प्यायचे काय? खडकवासला परिसरातील सांडपाणी व्यवस्थापनाकडे लक्ष देण्याची मागणी
पुणे : शहरातील वायुप्रदूषणाचा प्रश्न गंभीर असतानाच आता खडकवासला धरण परिसरातील सांडपाणी व्यवस्थापनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. खडकवासला धरणाच्या जलस्रोतांमध्ये सांडपाणी मिसळत असल्याच्या संभाव्य प्रकारांकडे लक्ष वेधत अमोल बालवडकर यांनी संबंधित परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांच्या निदर्शनास आलेल्या बाबींच्या पार्श्वभूमीवर धरणाच्या पाण्याचे संरक्षण आणि सांडपाण्याच्या योग्य व्यवस्थापनासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
खडकवासला परिसरातील गोरे बुद्रुक, गोरे खुर्द, सिंहगड पायथा, खानापूर, मांडवी आणि कुडजे आदी गावांच्या परिसरातील काही हॉटेल्स, रेस्टॉरंट्स तसेच व्यावसायिक आस्थापनांमधून निघणाऱ्या सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावली जाते का, याची तपासणी करण्याची गरज बालवडकर यांनी व्यक्त केली. प्रक्रिया न केलेले सांडपाणी धरणाच्या जलस्रोतांमध्ये मिसळत असल्यास त्याचा संभाव्य परिणाम पाण्याच्या गुणवत्तेवर आणि सार्वजनिक आरोग्यावर होऊ शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका प्रशासनाने खडकवासला धरण परिसरात नियमित गस्त घालून सांडपाणी सोडण्याच्या ठिकाणांची तपासणी करावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित व्यावसायिक आस्थापनांवर नियमानुसार कारवाई करावी. तसेच लागू नियमांनुसार आवश्यक असलेल्या आस्थापनांमध्ये सांडपाणी प्रक्रिया केंद्रे (STP) उभारली आहेत का, याची पडताळणी करावी. प्रक्रिया केलेले पाणी निर्धारित पर्यावरणीय निकषांनुसारच सोडले जात आहे, याचीही खात्री करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
ग्रामपंचायतींना सांडपाणी व्यवस्थापनासाठी निधी द्या
या प्रश्नाकडे केवळ ग्रामस्थांच्या चुकीच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून न पाहता, परिसरातील पायाभूत सुविधांची कमतरता आणि सांडपाणी व्यवस्थापनाच्या उपलब्ध पर्यायांचाही विचार करणे आवश्यक आहे. संबंधित ग्रामपंचायतींना आवश्यक सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा उभारण्यासाठी पुणे महानगरपालिका किंवा राज्य शासनाने निधी आणि तांत्रिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी भूमिका बालवडकर यांनी मांडली आहे.
खडकवासला धरण हे पुणे शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वाचे जलस्रोत असल्याने या परिसरातील जलप्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. पाण्याच्या गुणवत्तेची नियमित तपासणी करून त्याचे अहवाल सार्वजनिक करावेत, तसेच प्रदूषणाचे स्रोत आढळल्यास त्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
“हवा प्रदूषित, आता पाणीही दूषित; पुणेकरांनी श्वास घ्यायचा कसा, प्यायचे काय आणि जगायचे तरी कसे?” असा सवाल उपस्थित करत बालवडकर यांनी खडकवासला धरणातील पाण्याचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज अधोरेखित केली आहे.
मात्र, धरणातील पाणी प्रत्यक्ष दूषित झाले आहे का आणि त्यामागे कोणते स्रोत कारणीभूत आहेत, हे निश्चित करण्यासाठी संबंधित विभागाने पाण्याचे नमुने तपासून निष्कर्ष जाहीर करणे आवश्यक आहे. पुणेकरांना सुरक्षित पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि प्रभावी सांडपाणी व्यवस्थापनावर भर देण्याची मागणी यानिमित्ताने पुढे आली आहे.






