पुणे विद्यापीठातील मुलींचे भोजनगृह बंद; निकृष्ट अन्नाच्या तक्रारींनंतर FDA ची कारवाई


पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहातील भोजनगृहात अन्नाच्या गुणवत्तेबाबत वारंवार तक्रारी झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाई केली आहे. तपासणीदरम्यान स्वयंपाकघरात झुरळे आणि अस्वच्छता आढळल्याने संबंधित भोजनालय चालकाचे अन्न नोंदणी प्रमाणपत्र निलंबित करण्यात आले. त्यानंतर भोजनगृह बंद करण्यात आले.

 

विद्यार्थिनींच्या तक्रारीनुसार, २ आणि ३ ऑक्टोबर रोजी नाश्त्यातील पोह्यांमध्ये किडे आढळले होते. तसेच २८ आणि २९ सप्टेंबर रोजी भाजीमध्ये प्लास्टिकसदृश वस्तू आणि जेवणात धातूची तार आढळल्याचा आरोप करण्यात आला होता. या तक्रारींची दखल घेत ६ ऑक्टोबर रोजी अन्न सुरक्षा अधिकारी अजिंक्य उमाप यांच्या नेतृत्वाखाली FDA पथकाने तपासणी केली. या वेळी अन्नाचे नमुनेही तपासणीसाठी घेण्यात आले.

 

भोजनालयाचे संचालन मे. मराठा केटरर्स यांच्याकडून केले जात होते. अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन न झाल्याने प्रमाणपत्र निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली.

 

दरम्यान, विद्यार्थ्यांनी या कारवाईचे स्वागत केले असून, केवळ तात्पुरती कारवाई न करता दर्जेदार आणि सुरक्षित भोजनाची कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. विद्यापीठाच्या देखरेखीखाली केंद्रीकृत भोजनालय सुरू करण्याचा पर्यायही विद्यार्थी प्रतिनिधींनी मांडला आहे. अन्न नमुन्यांच्या प्रयोगशाळा तपासणीचा अंतिम निष्कर्ष अद्याप स्पष्ट झालेला नाही.


12
कृपया वोट करा.

पुणेकर LIVE च्या बातम्यांवर तुमचे मत मांडा.

हे देखील पहा...

error: Content is protected !!