
बाणेर : मुरकुटे गार्डन येथे कार्यरत असलेल्या आनंदवन ज्येष्ठ नागरिक संघाला बालेवाडी येथील एक्सपर्ट सुपरस्पेशलिटी क्लिनिकच्या वतीने व्हीलचेअर प्रदान करण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याबरोबरच आपत्कालीन परिस्थितीत गरजू रुग्णाला तातडीने रुग्णालयात हलविणे सोयीचे व्हावे, या सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम राबविण्यात आला.
मुरकुटे गार्डन येथे आनंदवन ज्येष्ठ नागरिक संघाचे सुमारे १५० ज्येष्ठ नागरिक नियमितपणे सहभागी होतात. दररोज सकाळी येथे हास्य क्लब, विविध व्यायामप्रकार तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने व्हीलचेअरची आवश्यकता लक्षात घेऊन क्लिनिकच्या वतीने ही मदत करण्यात आली.
एक्सपर्ट सुपरस्पेशलिटी क्लिनिकमध्ये डॉ. अक्षय काशिद (हृदयरोग तज्ज्ञ), डॉ. चिन्मय कुंभार (मेंदूरोग तज्ज्ञ) आणि डॉ. प्रसाद भाटे (गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट) हे तज्ज्ञ सेवा देत आहेत. यावेळी बाणेर-बालेवाडी मेडिकोस असोसिएशनचे संस्थापक डॉ. राजेश देशपांडे उपस्थित होते. आनंदवन ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने अजय कदम यांनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी एक्सपर्ट सुपरस्पेशलिटी क्लिनिकच्या वतीने आनंदवन ज्येष्ठ नागरिक संघातील सदस्यांसाठी कायमस्वरूपी ५० टक्के सवलतीची घोषणा करण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक वैद्यकीय सेवा सुलभतेने उपलब्ध व्हाव्यात, हा या निर्णयामागील उद्देश आहे.
तसेच, आरोग्य आणि आपत्कालीन सेवांचे महत्त्वाचे संपर्क क्रमांक एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत, यासाठी तयार करण्यात आलेल्या महत्त्वाच्या फोन नंबरच्या फलकाचे उद्घाटन डॉक्टरांच्या हस्ते करण्यात आले. आपत्कालीन प्रसंगी ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक सेवा व मदत तातडीने मिळावी, यासाठी हा फलक उपयुक्त ठरणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य, सुरक्षितता आणि सन्मान यासाठी वैद्यकीय क्षेत्राने सामाजिक बांधिलकी जपावी, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.








