‘स्कूल ठीक करो’ अभियानानंतर शाळांच्या दुरुस्तीला वेग. सरकारी शाळांमधील वीज, पाणी, स्वच्छतागृहांसह मूलभूत सुविधांवर भर.


मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद आणि सरकारी शाळांमधील मूलभूत सुविधांच्या दुरवस्थेचा मुद्दा चर्चेत आल्यानंतर शाळांच्या दुरुस्तीची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या ‘स्कूल ठीक करो’ अभियानानंतर सरकारने शाळांमधील पायाभूत सुविधांचा आढावा घेतल्याचा दावा करण्यात आला आहे.

राज्यातील जर्जर शाळा इमारती, वीज, पाणी, स्वच्छतागृहे तसेच वर्गखोल्यांमधील आवश्यक सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर भर देण्यात येणार आहे. शाळांच्या दुरुस्तीची कामे उपलब्ध निधीतून करण्याचे नियोजन असून, सुट्ट्यांच्या कालावधीत ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्याची कार्यवाही केली जाणार आहे.

बैठकीत सादर झालेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील ६३ हजार ८३६ जिल्हा परिषद शाळांपैकी ४० हजार ५३० शाळांमधील मुलींच्या स्वच्छतागृहांची अवस्था खराब असल्याचे समोर आले आहे. तसेच ६६३ शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची सुविधा नसल्याची, तर १ हजार ६३८ शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे.

शाळांमधील वर्गखोल्या, ब्लॅकबोर्ड, पिण्याचे पाणी, वीज आणि स्वच्छतागृह यांसारख्या मूलभूत सुविधांची दुरुस्ती करण्यासाठी वित्त आयोगाच्या निधीचा वापर करण्याचे नियोजन आहे. गणेशोत्सव आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामकाजाला अडथळा न आणता दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे.

दरम्यान, ‘स्कूल ठीक करो’ अभियानाच्या माध्यमातून सरकारी शाळांमधील पायाभूत सुविधांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. अभियानादरम्यान विविध शाळांना भेटी देऊन तेथील समस्या समोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही ठिकाणी अभियानाच्या कार्यकर्त्यांच्या शाळा भेटींवरून वादही निर्माण झाले असून, लातूर जिल्ह्यात दीपके आणि अन्य व्यक्तींविरोधात परवानगीशिवाय शाळेत प्रवेश केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, शाळांच्या प्रश्नानंतर अभिजीत दीपके यांनी आता ‘आदिवासी स्कूल ठीक करो’ या नव्या अभियानाची घोषणा केली आहे. गडचिरोलीपासून या अभियानाला सुरुवात करण्यात येणार असून, आदिवासी भागातील शाळांमधील मूलभूत सुविधा, विद्यार्थ्यांच्या अडचणी आणि शिक्षणाच्या परिस्थितीचा आढावा घेण्याचा या मोहिमेचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.


12
कृपया वोट करा.

पुणेकर LIVE च्या बातम्यांवर तुमचे मत मांडा.

हे देखील पहा...

error: Content is protected !!