
चारही धरणांमध्ये ८०.६५ टक्के जलसाठा; वरसगाव धरणात सर्वाधिक पाणी, तर खडकवासल्यात सर्वांत कमी साठा
पुणे : मुरासु चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पुणे शहरासह परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. ऐन हिवाळ्याच्या सुरुवातीलाच झालेल्या या पावसामुळे खडकवासला धरणसाखळीच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्याला काहीसा दिलासा मिळाला आहे. सध्या खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांमध्ये मिळून २३.५१ टीएमसी म्हणजेच ८०.६५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
मिळालेल्या आकडेवारीनुसार, रविवार (१ नोव्हेंबर) सकाळी सहा ते सोमवार (२ नोव्हेंबर) सकाळी सहा या २४ तासांच्या कालावधीत चारही धरणांच्या परिसरात पावसाची नोंद झाली. यामध्ये पानशेत धरण परिसरात सर्वाधिक १३ मिलिमीटर, वरसगाव येथे ११ मिलिमीटर, खडकवासला येथे ८ मिलिमीटर, तर टेमघर येथे ५ मिलिमीटर पाऊस झाला.
गतवर्षीपेक्षा पाणीसाठ्यात मोठी घट
यंदा अवकाळी पावसामुळे काहीसा दिलासा मिळत असला, तरी गतवर्षीच्या तुलनेत धरणांमधील पाणीसाठा कमी आहे. गेल्या वर्षी २ नोव्हेंबर रोजी चारही धरणांमध्ये २८.४० टीएमसी म्हणजेच ९७.४१ टक्के पाणीसाठा होता. यंदा तो २३.५१ टीएमसीवर असून, गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ४.८९ टीएमसी पाणी कमी आहे.
कोणत्या धरणात किती पाणीसाठा?
– खडकवासला : १.१२ टीएमसी (५६.८२ टक्के)
– पानशेत : ८.२७ टीएमसी (७७.६७ टक्के)
– वरसगाव : १०.९८ टीएमसी (८५.६३ टक्के)
– टेमघर : ३.१४ टीएमसी (८४.६३ टक्के)
चारही धरणांमध्ये वरसगाव धरणात सर्वाधिक ८५.६३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर खडकवासला धरणात सर्वांत कमी ५६.८२ टक्के पाणीसाठा आहे.
टेमघर परिसरात सर्वाधिक पावसाची नोंद
१ जूनपासून आतापर्यंतच्या पावसाचा विचार करता टेमघर धरण परिसरात सर्वाधिक ३ हजार २५२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. पानशेत येथे २ हजार ३५५, वरसगाव येथे २ हजार २०८, तर खडकवासला धरण परिसरात ७९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, मुरासु चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. या पावसामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्राला काही प्रमाणात फायदा होत असला, तरी गतवर्षीच्या तुलनेत कमी असलेला जलसाठा पाहता पुणेकरांसाठी पाण्याचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे.







