पाषाण नेकलेस गार्डन परिसरात कारच्या धडकेत आयटी अभियंत्याचा मृत्यू; १९ वर्षीय चालक जखमी..

पुणे : शहरात पहाटेच्या वेळी मॉर्निंग वॉक, जॉगिंग आणि व्यायामासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पाषाण-बावधन रस्त्यावरील नेकलेस गार्डन परिसरात दि. १२ रोजी सकाळी भरधाव कारने धडक दिल्याने ४२ वर्षीय आयटी अभियंता विरेंद्र द्विवेदी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पादचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विरेंद्र द्विवेदी हे नेहमीप्रमाणे सकाळी जॉगिंगसाठी बाहेर पडले होते. पाषाण-बावधन रस्त्यावरील नेकलेस गार्डन परिसरातून जात असताना मागून आलेल्या भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, द्विवेदी गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळले.
या अपघातातील कार एका १९ वर्षीय तरुणाकडून चालवली जात असल्याची माहिती समोर आली आहे. पहाटे रस्ता मोकळा असल्याने कारचा वेग अधिक असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अपघातात कारचेही मोठे नुकसान झाले असून चालक तरुण जखमी झाल्याची माहिती आहे.
अपघातानंतर जखमी अवस्थेतील द्विवेदी यांना कारमधील व्यक्तींनी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. या घटनेमुळे द्विवेदी यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, पोलिसांच्या तपासात अपघातग्रस्त कार ब्लूरेज डेव्हलपर्स या कंपनीच्या नावावर नोंदणीकृत असल्याची माहिती समोर आली आहे. आरटीओ नोंदीनुसार या वाहनाचा पत्ता अबिल हाऊस असा असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अपघात नेमक्या कोणत्या परिस्थितीत झाला, कारचा वेग किती होता आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण कसे सुटले, याचा तपास केला जात आहे. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांकडून तपासले जात आहे.
पहाटेच्या वेळी पादचाऱ्यांची सुरक्षा धोक्यात
शहरातील विविध रस्त्यांवर पहाटे मॉर्निंग वॉक आणि जॉगिंगसाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडतात. मात्र, याच वेळी मोकळ्या रस्त्यांवरून भरधाव वेगाने वाहने चालवली जात असल्याने पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. तरुण वाहनचालकांकडून वेगावर नियंत्रण ठेवले जावे, तसेच पालकांनीही नवोदित चालकांना वाहन देताना आवश्यक ती काळजी घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
प्रशासनाने पहाटेच्या वेळेत संवेदनशील रस्त्यांवर गस्त वाढवावी, वेगमर्यादेची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





