
पुणेकरांची सकाळ पावसाने ओली! शाळकरी विद्यार्थी, चाकरमान्यांची धावपळ; अचानक आलेल्या सरींमुळे जनजीवन विस्कळीत.
पुणे : पुणे शहर आणि परिसरात आज (सोमवारी) सकाळीच जोरदार पावसाने हजेरी लावली. सकाळच्या वेळेत अचानक सुरू झालेल्या पावसामुळे शाळेत जाणारे विद्यार्थी, पालक तसेच कामावर निघालेले चाकरमानी यांची मोठी तारांबळ उडाली. अनेकांना पावसापासून बचाव करण्यासाठी रस्त्याच्या कडेला, दुकानांच्या आडोशाला आणि बसथांब्यांवर थांबावे लागले.
सकाळी शाळा आणि कार्यालयांच्या वेळेतच पावसाचा जोर वाढल्याने रस्त्यांवर छत्र्या आणि रेनकोट घेऊन नागरिकांची धावपळ सुरू होती. दुचाकीस्वारांना पावसामुळे वाहन चालवताना अडचणींचा सामना करावा लागला. अचानक आलेल्या पावसामुळे सकाळच्या वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नोव्हेंबर महिन्यात सकाळीच पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.
पाऊस का पडत आहे?
हवामानातील बदलामुळे नोव्हेंबर महिन्यातही राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातील दक्षिण अंदमान समुद्र परिसरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असून, त्याचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर होत आहे. या हवामान प्रणालीमुळे वातावरणात आर्द्रता वाढून ढगांची निर्मिती होत आहे. त्यातून पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत पावसाच्या सरी कोसळत आहेत. स्थानिक वातावरणातील बदलांमुळे काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाचा इशारा : पुणे जिल्ह्यासह काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटाची शक्यता लक्षात घेता सकाळी १० वाजेपर्यंत यलो वॉच जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी विजांच्या वेळी झाडांखाली किंवा मोकळ्या जागेत थांबणे टाळावे.








