बाणेरमध्ये जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांसह अल्पवयीन ताब्यात.


सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने बाणेर पोलिसांची कारवाई; सोन्याचे दागिने आणि ऑनलाइन व्यवहारातून एकूण १,२२,९९९.९२ रुपयांचा ऐवज लुटल्याचा आरोप

 

पुणे : बाणेर परिसरात पादचाऱ्याला लक्ष्य करून जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा बाणेर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात तीन तरुणांसह एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे २.१५ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी कै. विठोबा बाळाजी मुरकुटे गार्डन, पॅनकार्ड क्लब रोड, बाणेर, पुणे येथून जात होते. त्यावेळी त्यांच्या हातात दोन बॅगा व पाठीवर सॅक होती. समोरून पायी आलेल्या दोन इसमांनी दुचाकीवरून आलेल्या अन्य दोन साथीदारांच्या मदतीने त्यांना गाठले. त्यानंतर संगनमताने त्यांच्या हातातील १६ कॅरेटचे ब्रेसलेट, १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन आणि ऑनलाइन व्यवहारातून १८,९९९.९२ रुपये अशी एकूण १,२२,९९९.९२ रुपयांची मालमत्ता जबरदस्तीने चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद आहे.

 

या प्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३१०(२), ३०९(४), ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध

 

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन बाणेर पोलिसांच्या तपास पथकाने घटनास्थळासह परिसरातील विविध सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला. तपासात आरोपी धायरी आणि पुणे परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले.

 

या प्रकरणात पोलिसांनी खालील आरोपींना ताब्यात घेतले आहे.

 

१. पवन रामदास पारगे, वय १८ वर्षे, रा. गल्ली नं. १७०, धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे.

 

२. साहिल बाळासाहेब मरगळे, वय १९ वर्षे, रा. इंद्रप्रस्थ लॉन्सजवळ, कोल्हेवाडी, पुणे.

 

३. विशाल आबासाहेब झोडगे, वय १८ वर्षे, रा. कदमवाकवस्ती, काळभैरव मंदिराजवळ, धायरीगाव, पुणे.

 

४. आदित्य हरिश्चंद्र कोळकर, वय १८ वर्षे, रा. गल्ली नं. १३, बी-शिंदेचाळ, गारमाळधायरी, पुणे, तसेच एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

 

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास

 

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ४, पुणे शहर व चिलूमुला रजनिकांत आणि सहायक पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे शहर ब्रह्मदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 

बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय खिल्लारे आणि सहायक पोलीस निरीक्षक गणेश रायकर यांच्या सूचनेनुसार तपास पथकाने काम केले.

 

या पथकात पोलीस अंमलदार गणेश गायकवाड, बाबा आहेर, किशन शिंगे, संदेश निकाळजे, संजय दहिभाते, शरद राऊत, अतुल इंगळे, प्रदीप खरात, गजानन अवतिरक, स्वप्नील मराठे, गणेश भोईने आणि समीर पवार यांनी सहभाग घेतला.

 

या प्रकरणाचा पुढील तपास बाणेर पोलीस करत आहेत.


12
कृपया वोट करा.

पुणेकर LIVE च्या बातम्यांवर तुमचे मत मांडा.

हे देखील पहा...

error: Content is protected !!